पूर्वीचा खेड आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ असे मिळून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यंदा चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी आढळराव यांनी शड्डू ठोकले आहेत. शिरूरमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद असली, तरी भाजपच्या वाढलेल्या ताकदीचे आव्हान आढळराव यांच्यासमोर नक्कीच आहे. दरवेळीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे.

शिवाजीराव आढळराव पूर्वीचे राष्ट्रवादीचे. विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय. मात्र, त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर आढळराव शिवसेनेत आले. पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून ते प्रथम खासदार झाले. तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर, २००९ मध्ये बदलत्या रचनेनुसार शिरूर मतदारसंघ तयार झाला. तेव्हा राष्ट्रवादीने तत्कालीन आमदार विलास लांडे यांना खासदारकीसाठी िरगणात उतरवले. मात्र, आढळराव यांच्यासमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही. पावणेदोन लाख मतांच्या फरकाने लांडे तेव्हा पराभूत झाले. २०१४ मध्ये आढळराव यांच्यासमोर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना उतरवण्यात आले. मात्र, जवळपास तीन लाखांच्या फरकाने आढळराव विजयी झाले. आता आढळराव चौथ्यांदा रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. या वेळी राष्ट्रवादीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आढळरावांशी दोन हात करावेत, असा सूर मतदारसंघात तसेच राष्ट्रवादी वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही वळसे यांना शिरूर लढवण्याविषयी विचारणा केल्याचे सांगण्यात येते. अद्यापही वळसे यांची मानसिक तयारी झालेली नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिलेला नाही. परिणामी, राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच आहे.

लोकसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुका भाजप-शिवसेनेने युती म्हणून लढवल्या. मात्र, या वेळी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शिरूरसाठी आढळराव यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत भाजपला रणनीती ठरवावी लागणार असून तगडा उमेदवार रिंगणात आणावा लागणार आहे. सध्या भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. मात्र, लांडगे यांनी अद्याप विधानसभा की लोकसभा, या विषयीचे पत्ते खुले केलेले नाहीत. पक्षानेही अद्याप स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. आढळराव आणि लांडगे यांच्यात काही महिन्यांपासून शह-काटशाहचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे ते समोरासमोर येतील, अशीच शक्यता मतदारसंघात व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात अजून बराच कालावधी असल्याने राजकीय चित्र धूसर आहे. मतदारसंघात गेली अनेक वर्षे असलेले प्रश्न अजूनही कायम आहेत. याशिवाय, बैलगाडा शर्यती, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न, नाशिक रस्ता रुंदीकरण, नाशिक-पुणे रेल्वे, चाकण विमानतळाच्या स्थलांतरास जबाबदार कोण आदी विविध प्रश्न महत्त्वाचे राहणार आहेत.

 

शिरूर लोकसभेतील आमदार

* सुरेश गोरे, खेड (शिवसेना)

*  महेश लांडगे, भोसरी (भाजप)

*  बाबुराव पाचर्णे, शिरूर (भाजप)

*  दिलीप वळसे, आंबेगाव (राष्ट्रवादी)

*  योगेश टिळेकर, हडपसर (भाजप)

*  शरद सोनवणे, जुन्नर (मनसे)