सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. विजय शरद माने (वय ४३, रा. पाषाण) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. विजयचे वडील शरद माने पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त होते. विजय आणि त्याचे मित्र रविवारी रात्री मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये गेले होते. त्या वेळी विजयचा किरकोळ कारणावरुन काहीजणांशी वाद झाला.

हेही वाचा >>> पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपची शुक्रवारी जाहीर सभा

विजयने त्याच्याकडील पिस्तुलातून हॅाटेलमध्ये गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर हॅाटेलमध्ये घबराट उडाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विजयला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी विजय आणि मित्रांनी मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये गोंधळ घातला होता. त्या वेळी विजयसह मित्रांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.