आजारी असलेल्या रँग्लर परांजपे यांच्यासाठी दोन गीते गाणाऱ्या.. आमटी करणाऱ्या शैला दातार यांना दूरध्वनीवरून दोन बंदिशी ऐकविणाऱ्या.. ‘स्वयंवर’ नाटकातील काम पाहून कीर्ती शिलेदार यांना स्वत:ची मेकअपची पेटी देणाऱ्या.. ‘बोला अमृत बोला’, ‘मनरमणा मधुसूदना’, ‘आला खुशीत सिमदर’ या गीतांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान संपादन केलेल्या ज्योत्स्ना भोळे या व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे मंगळवारी उलगडली. लघुपटाच्या माध्यमातून ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरवंदना प्रतिष्ठान’तर्फे निर्मिती केलेल्या ‘ज्योत्स्ना.. अमृतवर्षिणी’ या लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. या लघुपटाचे दिग्दर्शक सुधीर मोघे, प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त आणि ज्योत्स्नाबाईंची कन्या वंदना खांडेकर, प्रा. प्रकाश भोंडे या प्रसंगी उपस्थित होते. सई परांजपे, डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता, नंदू नाटेकर, वीणा देव, आशालता, रामदास कामत, मंगेश तेंडुलकर यांनी सांगितलेल्या आठवणींचा या लघुपटामध्ये समावेश आहे.
शाळेत असताना मी ज्योत्स्नाबाईंच्या घरी जायचो. तेव्हा गावात राहणाऱ्यांना डेक्कन जिमखान्याविषयी रहस्यमय कुतूहल होते, असे सांगून डॉ. मोहन आगाशे म्हणाले, रंगभूमीवर काम करणाऱ्या बालगंधर्वाना मी पाहिले नाही. पण, त्यांच्याविषयीच्या श्रवणीय स्मृती आहेत. तसेच ज्योत्स्नाबाईंचे आहे. लघुपटामुळे त्यातील रहस्य कमी होण्यास मदत होईल.
सुधीर मोघे म्हणाले, ज्योत्स्ना भोळे या व्यक्तित्वाचा सहजसोपेपणा आणि उत्स्फूर्तता या लघुपटामध्ये यावी हाच प्रयत्न केला. हा लघुपट करताना ज्योत्स्नाबाई अधिकाधिक समजत गेल्या.
वंदना खांडेकर म्हणाल्या, ‘आंधळ्याची शाळा’ या नाटकाद्वारे आईने रंगभूमीवर पदार्पण केले त्याला ८० वर्षे पूर्ण झाली. जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘कुलवधू’ नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर येत आहे. नाटय़पदे- भीवगीतांच्या स्पर्धा, विविध भूमिकांच्या छायाचित्रांचा समावेश असलेली दिनदर्शिका हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गोवा कला अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या नाटय़महोत्सवातील उत्कृष्ट संगीत अभिनेत्रीस ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.