पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : आरोग्यविषयक समस्यांमुळे ध्वनिक्षेपक यंत्रणेबाबत न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन झाले तर तर गुन्हे दाखल करावे लागतील. कोल्हापूरमध्ये आम्ही जनजागृतीतून हा प्रश्न सोडविला. विसर्जनाला रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, या मागणीबाबत कायदेविषयक चर्चा सुरू असून मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते.

नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचे, महाराष्ट्र तरुण मंडळाला द्वितीय, लष्करमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाला तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाला चौथे, तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

बापट म्हणाले, गणेश मंडळांनी चांगले काम करावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने उत्तेजन दिले. गणेशोत्सव ही एक चळवळ असून त्यातून चांगले प्रबोधन होते.

मिसाळ म्हणाल्या, पुढील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तीन महिने आपल्याला परवानग्या आणि अडचणी सोडविण्याची सर्व तयारी करायला हवी. तरच हा उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल.

टिळक म्हणाल्या, गणेशोत्सवात सात दिवस मंडळांचे देखावे रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत केली आहे. आपण विसर्जन मिरवणूक वेळेवर संपवायचा आदर्श घालून द्यायला हवा. अशोक गोडसे, अंकुश काकडे, अण्णा थोरात, हेमंत रासने यांनी मनोगत व्यक्त केले.