लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे भाषण न छापण्याचा निर्णय घ्यायला अखिल भारतीय साहित्य महामंडळ सेन्सॉर बोर्ड कधीपासून झाले, असा प्रश्न ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला आहे. माझे भाषण न छापणे म्हणजे राज्यघटनेचा अवमान असून, ती गद्दारी असल्याची टीकाही त्यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर केली.
पिंपरीमध्ये नुकत्याच झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी श्रीपाल सबनीस यांनी लिहून तयार केलेले भाषण न छापण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर सबनीसांनी टीका केली. ते म्हणाले, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे भाषण छापले जात नाही. ते रसिकांपर्यंत पोहोचविले जात नाही. हा एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान आहे. अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली कोणी? महामंडळ सेन्सॉर बोर्डासारखे कधीपासून वागायला लागले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
माझ्या भाषणातील कोणते मुद्दे खटकले, याबद्दल मला महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीही सांगण्यात आले नाही. माझ्याबरोबर कोणताही संवाद ठेवण्यात आलेला नाही. महामंडळाच्या बैठकीचे निमंत्रणही मला देण्यात आलेले नाही, असाही आरोप त्यांनी केला. माझ्या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका प्रकाशित करण्यास अनेक प्रकाशक उत्सुक आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2016 रोजी प्रकाशित
साहित्य महामंडळ सेन्सॉर बोर्ड कधीपासून झाले? – सबनीसांचा सवाल
अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली कोणी?
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-01-2016 at 16:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shripal sabnis criticized sahitya mahamandals work culture