पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात सर्वच नेते अॅक्टिव्ह झालेत. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवबंधन बांधल्याने आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना हरवायचं आहे. आपला मतदारसंघ परत खेचून आणायचा, असे म्हणात संजोग वाघेरे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
यावर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रत्युत्तर दिल असून ज्या व्यक्तीने एकही सार्वजनिक निवडणूक लढवली नाही. अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करायचं. कुणी काही बोललं म्हणजे उमेदवार विजयी होत नसतो, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. बारणे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवणार आहे. मतदारच कोणाला निवडून द्यायचे हे ठरवत असतो. मावळची जनता विकासाला मत देतील, असा विश्वास व्यक्त केला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मलाच उमेदवारी द्यायची असं ठरवलं. माझ्यापेक्षा नेतेच तुम्हाला या संदर्भात सांगतील. संजोग वाघेरे यांच्याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. मी कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवारावर व्यक्तिगत बोलत नाही. २०२४ चा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक झाली, असे बारणे म्हणाले.
हेही वाचा – नववर्ष स्वागतासाठी गर्दी; डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत उद्या असा होणार बदल
ऐनवेळी पार्थ पवारला उमेदवारी दिली जाऊ शकते, या प्रश्नावर बोलताना बारणे म्हणाले, भाजपाच्या केंद्रीय आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मावळ लोकसभेसंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही. पार्थ पवार यांच्यावर बोलणं बारणे यांनी टाळलं.