पुणे : इन्फ्लूएंझा या विषाणूमुळे होणाऱ्या फ्लू प्रकारातील तापासाठी लस उपलब्ध आहे, मात्र ती घेण्याकडे नागरिकांचा कल नाही. ही लस दरवर्षी घेतली असता फ्लू प्रकारातील ताप आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत टाळण्यास मदत होईल, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लू आणि संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत वर्षभर दिसणाऱ्या फ्लूच्या नव्या उत्परिवर्तनांवर प्रभावी ठरेल अशी लस दरवर्षी तयार केली जाते. सर्व प्रकारच्या फ्लूपासून ही लस संरक्षण देते. त्यामुळे फ्लू आणि त्यातून उद्भवणारी न्यूमोनियासारखी गुंतागुंत टाळणे शक्य होते. लस घेतल्यानंतर ताप, अंग दुखणे, किं वा लस घेतलेल्या हातावर येणारी सूज यांसारख्या दुष्परिणामांची भीती बाळगून अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करतात.

जनरल फिजिशियन डॉ. मुके श बुधवानी म्हणाले, करोना महासाथीच्या काळात मागील वर्षी फ्लू आणि फ्लूसदृश विकारांचे प्रमाण कमी होते. मात्र, यावर्षी पुन्हा हे आजार पूर्ववत झालेले दिसून येत आहेत. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्लू हा गंभीर आजार निर्माण करू शकतो. लस घेतली असेल तर वातावरणातील बदलामुळे होणारा फ्लू, त्यातून रुग्णालयात दाखल होण्याची गरज आणि मृत्यू या बाबी टाळणे शक्य आहे. त्यामुळे जोखीम गटातील सर्व नागरिकांनी तसेच इतर नागरिकांनीही फ्लूचा धोका टाळण्यासाठी लस घेणे उपयुक्त आहे.