सिम्बायोसिसच्या कौशल्य विकास विद्यापीठाला मान्यता मिळाली असून इंदूर येथे हे विद्यापीठ सुरू होत आहे. वाहनउद्योग, बांधकाम, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, विक्री या विषयांतील विविध अभ्यासक्रम या विद्यापीठांत चालवले जाणार आहेत.

कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे स्वतंत्र विद्यापीठ इंदूरमध्ये सुरू होत आहे. सिम्बायोसिसने जर्मनीमधील कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची स्थापना केली आहे. कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांबरोबरच पदवी अभ्यासक्रमही या विद्यापीठाकडून चालवण्यात येणार आहेत. वाहनउद्योग, बांधकाम, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, विक्री, बँकिंग अँड फायनान्स या विषयांचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या विद्यापीठातून निवासी अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहेत. भारतातील आघाडीच्या वीस कंपन्यांबरोबर आणि जर्मनीतील १२ कंपन्यांबरोबर विद्यापीठाचे करार झाले आहेत. हे विद्यापीठ उभे करण्यासाठी सिम्बायोसिसने २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंचवीस एकर परिसरात विद्यापीठाचा विस्तार झाला असून शैक्षणिक इमारत, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, कार्यशाळा, प्रयोगशाळा अशा सुविधा विद्यापीठात आहेत. या शैक्षणिक वर्षांपासून या विद्यापीठातील अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.