पुणे : राज्याच्या बहुतांश भागातील रात्रीच्या किमान तापमानात किंचित घट झाल्याने हलका गारवा जाणवत आहे. काही भागांत पुढील तीन-चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात वाढ होईल. दिवाळीच्या दिवसांतही हलका गारवा राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्र सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. कोकण विभागात काही भागात पावसाळी वातावरण असले तरी दोन दिवसांत या भागातही हवामान कोरडे होणार आहे. कोकण विभागातील काही भाग वगळता सध्या राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्रात ते १५ ते १८ अंश सेल्सिअसवर, मराठवाडय़ात १६ ते १९ अंशांवर आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घटले असून, तेथे बहुतांश भागात किमान तापमान १६ ते १७ अंशांवर आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १४.८ अंश इतके नोंदविण्यात आले. दिवसाच्या कमाल तापमानातही अनेक ठिकाणी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे.