पाणीसाठय़ात .०४ टीएमसीची वाढ होणार
खडकवासला धरणातील सुमारे दहा किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्यात येणार असून, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ामध्ये .०४ टीएमसी (अब्ज घनफूट) वाढ होऊ शकणार आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून दीड कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, खडकवासला धरणातून गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. धरणामध्ये सुमारे चार लाख ब्रास गाळ आहे. तो काढण्याबाबत खडकवासला प्रकल्पाकडून मागणी करण्यात येत आहे. सध्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, इन्फोसिस कंपनी व ‘ग्रीन थम’ यांच्याकडून गाळ काढण्याचे काम केले जात आहे. यासोबतच आता महसूल विभाग, पुणे व िपपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभाग, रस्ते वाहतूक मंडळ, खानिकर्म विभाग यांच्याकडून गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली हे काम करण्यात येणार आहे.
धरणातून काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल. उर्वरित गाळ धरणाच्या कडेला टाकण्यात येणार आहे, मात्र तो पुन्हा पाण्यात येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. सध्या मुख्यमंत्री निधीतून मंजूर झालेला दीड कोटींचा निधी कामावर खर्च झाल्यानंतर पुन्हा निधी मिळणार आहे. हा सर्व निधी आतापर्यंत झालेल्या कामावर नव्हे, तर यापुढे करण्यात येणाऱ्या कामांवर खर्च करण्यात येणार असून, त्यासाठी जीपीए मॅिपग करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.