गणेश द. राऊत

सामाजिक चळवळींच्या संदर्भात पुणे शहराचे या चळवळींशी जैविक नाते आहे, असे दिसते.

पुणे शहराला मोठा इतिहास आहे. या शहराचे महत्त्व संपूर्ण हिंदुस्तानमध्ये मध्ययुगात प्रस्थापित झाले. मध्ययुगात या शहराला जणू राजधानीचा दर्जाच प्राप्त झाला. १९-२०व्या शतकात या शहराने अनेक चळवळींना, वादविवादांना अवकाश प्राप्त करून दिले. यामुळे हे शहर आजही भारतातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे तिथे काय उणे? असे उगाचच म्हणत नाही. या सामाजिक चळवळींचा इतिहास शोधण्यासाठी थोडे मागे जायला हवे.

शहर पुणे, खंड १ मध्ये पृ. २७५ वर एलिनॉर झेलिएट (संशोधक, कार्लटन महाविद्यालय, मिनिआपोलिस – आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक) यांनी एक निरीक्षण नोंदविले आहे. ते पुण्याच्या सामाजिक इतिहासाच्या आणि चळवळींच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. त्यांच्या लेखनाचे सार म्हणजे – चौदाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात पुण्यावर दिल्लीच्या सुलतानाचे राज्य होते. त्यावेळी पुणे आणि जुन्या कसब्याच्या पूर्वेस असणारा नागझरीच्या पलीकडील मंगळवार पेठेचा भाग याच्यामध्ये भिंत बांधून गाव वेगळे केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तटबंदी (सामाजिक विभागणी) निकालात काढली. यावरून आपणास तत्कालीन कालखंडातील सामाजिक विभागणी लक्षात येऊ शकेल.

हेही वाचा >>> वर्धापनदिन विशेष : विद्यापीठांचे पुणे

पुणे शहरात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून पुणे शहरातील सामाजिक चळवळींचे नाते वैश्विक पातळीवर जोडले, त्या महात्मा फुले यांच्या धनंजय कीर लिखित चरित्राचे उपशीर्षकच मुळी ‘आमच्या समाजक्रांतीचे जनक’ असे आहे. पुण्यात जन्माला आलेले आणि पुण्यातच अखेरचा श्वास घेतलेले जोतीराव स्वकर्तृत्वाने ‘महात्मा’ झाले यातच त्यांच्या कर्तृत्वाचे सार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना भगवान बुद्ध, महात्मा कबीर यांच्या बरोबरीने तिसरे गुरू मानत असत. म्हणूनच ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर महात्मा जोतिराव फुले या चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात – ‘‘अस्पृश्य, अदर्शनीय नि अनभिगम्य समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारा पहिला भारतीय, आधुनिक भारतातील स्त्रीशिक्षणाचा जनक, भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य ह्यांचा उद्गाता, शेतकरी व कामगार ह्यांची दु:खे नि दारिद्र्य निवारण्यासाठी चळवळ उभारणारा पहिला पुढारी, जातिभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता, सामान्य जनतेच्या दु:खाला अन् दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्य तत्त्वाने भारून गेलेला खरा सत्यशोधक अशा ह्या नरोत्तमास महात्मा गांधींनी खरा महात्मा म्हणून गौरवावे, वीर सावरकरांनी समाजक्रांतिकारक म्हणून प्रशंसावे, भारतभूषण डॉ. आंबेडकरांनी गुरू मानून त्यांचा जयजयकार करावा आणि न्यायमूर्ती रानडे यांनी त्याचे सहकार्य घ्यावे यावरूनच जोतीरावांच्या ऐतिहासिक भूमिकेची सार्थकता व श्रेष्ठता पटण्यासारखी आहे.’’

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रभाव सगळ्याच समाजसुधारकांवर पडलेला दिसून येतो. यात पुण्याशी संबंध असणारांमध्ये गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका (सार्वजनिक सभेची स्थापना, पुण्यातील दारूगुत्ते बंद करा, स्वदेशीला प्राधान्य, पत्नीच्या सहाय्याने सर्व महिलांसाठी हळदी-कुंकवाचा समारंभ.), न्या. म.गो. रानडे व रमाबाई रानडे (पुण्याचे रुपांतर संस्थायुक्त पुण्यामध्ये करणे.), गो.ग. आगरकर (सर्व समाजासाठी सार्वजनिक नळ खुले असले पाहिजेत), पं. रमाबाई, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे (महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारणे), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डिप्रेस्ड क्लासेस मिशन), श्री.म. माटे (माणुसकीच्या अंतरंगाचा शोध घेणे) अशांचा समावेश आहे.

येथवर आपण पुण्याच्या इतिहासातील सामाजिक सुधारणा चळवळीतील प्रमुख घटनांची नोंद घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्या कमी शब्दमर्यादेत हा विषय मांडणे अवघड आहे. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्ती व घटनांची नोंद घेऊन दुसऱ्यांच्या अलक्षित कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यातील सामाजिक सुधारणा चळवळींचा अभ्यास करताना प्रमुख धर्म आणि आधुनिक पुण्याचे वैशिष्ट्य असणारे विविध छोटे-छोटे समूह यांचा विचार करणे अपरिहार्य आहे. पुणे हे आधुनिक महाराष्ट्रातील संस्कृतीचे एक केंद्र बनण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे इसवी सन १८२१ मधील संस्कृत महाविद्यालयाची स्थापना होय.

हेही वाचा >>> वर्धापनदिन विशेष: ध्यासमग्न उद्योगपती : रवी पंडित

शिवराम जानबा कांबळे (१८७५) यांनी इंग्रजी शिकून रात्रशाळा सुरू केली आणि पोस्टमन व प्यून यांना इंग्रजी शिकविण्यास सुरुवात केली. कांबळे आणि सुभेदार बहादूर गंगाराम कृष्णाजी यांनी ब्रिटिश सरकारकडे एक अर्ज पाठविला. या दोघांनी पददलीत समाजातील लोकांना सरकारी सेवेत, पोलीस खात्यात तसेच लष्करात पुन्हा भरती करून घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. याच कांबळे यांनी १९२९ चा ‘पर्वती सत्याग्रह’ (पुण्यातील ख्यातनाम अशा पर्वती टेकडीवरील मंदिरात सर्वांना खुला प्रवेश मिळण्याचे आंदोलन गाजविले.)

खान बहादूर महंमद हिदायतुल्ला (१८८६ – १९५२) यांनी पुण्यात ‘बालवीर चळवळ’ लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतला.

शेख यासिन फत्तेलाल (१८९३ – १९६४) प्रभात फिल्म कंपनीचे मालक होते.

फत्तेलाल आणि विष्णुपंत दामले यांनी १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ चित्रपट निर्माण केला. १९३७ च्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक’ असा गौरव त्यास प्राप्त झाला. १९४० मध्ये त्यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपट काढला. अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होय.

झुबेदा खातून यांनी पुण्यात विरोधाला तोंड देऊन मुंबई विद्यापीठातून १९१८ मध्ये मॅट्रिक्युलेक्शन पूर्ण केले. पुण्यात सेंट्रल उर्दू स्कूल मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केले. उर्दूभाषी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वर्ग सुरू केले. महिला शिक्षण व शिक्षिकांना प्रशिक्षित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

श्रीमती कमरुन्निसा महंमद अली (१८९८-१९५१) यांनी १९२० मध्ये गांधींजींच्या चळवळीत भाग घेऊन खादीचा संदेश मुस्लिम महिलांमध्ये पसरविला. खादी लोकप्रिय करणे, स्वदेशी दुकानांची स्थापना करणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, विधवा महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे इत्यादी कामे त्यांनी केली.

खान बहादूर प्रो. शेख अब्दुल कादर सरफराज हे इंडियन एज्युकेशनल सर्व्हिसमध्ये गेलेले एकमात्र पुणेकर होत.

त्यांनी नवरोसजी वाडिया महाविद्यालयात उर्दू व पर्शियन विभागाची स्थापना केली. मुस्लिम समाजात बॅ. सर रफीउद्दीन अहमद (१८६५) यांचे कार्य. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. त्यांच्यामुळे मुस्लिम मुले व मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा उपलब्ध करण्याची व्यवस्था सरकारने केली. पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र ट्रेनिंग कॉलेजची उभारणी झाली.

हाजी दोस्त महंमद पीर महंमद यांनी पुण्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी प्राथमिक शाळा इमारती, मुलींसाठी अनाथालय, मुलींच्या विवाहखर्चाची तरतूद त्यांनी केली.

सर इब्राहिम हरून जाफर (१८८०-१९३१) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अखिल भारतीय मुस्लिम शैक्षणिक परिषद’ (१९२७) भरविली गेली. या परिषदेस सरोजिनी नायडू, झाकीर हुसेन, सैफुद्दिन किचलू हजर होते.

फिरोज पूनावाला ‘झिरो बँक इंटरेस्ट एंटरप्राईज’ संकल्पनेचे पुरस्कर्ते होते. आजारी आणि व्याज भरत-भरत असलेला लघु-उद्याोग एक वर्धिष्णू उद्याोग व्हावा यासाठी त्यांनी चळवळ उभारली.

जैन समाजात सामुदायिक विवाह चळवळ, विद्यार्थी सहाय्य योजना, समाज घटकांना मदत योजना सुरू झाल्या.

सिंधी समाजात साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून काम चालू आहे. यात शैक्षणिक कार्य, वेल्फेअर फंड काम चालू आहे. सिंधू योजना केंद्र यांच्या मदतीने ‘सिंधीयालॉजी’ या क्षेत्रात संशोधन सुरू झाले. ख्रिास्ती समाजाने शैक्षणिक क्षेत्रात, अनाथाश्रम संदर्भात, रुग्णालये, अनाथालये, स्त्री हक्क या संदर्भात कार्य केले. बौद्ध व शीख हे समाज यासंदर्भात मागे नाहीत. स्त्री-प्रश्न – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विधवेचा पुनर्विवाह ‘सशास्रा की अशास्रा’ हा वाद सतत आठ दिवस शंकराचार्यांच्या न्यायालयापुढे चालला. (इ. स. १८७०). सुधारकपक्षाला एक मत कमी पडल्याने त्यांचा पराभवच झाला! पण हा पराभवही प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. शास्त्राधार न घेताही अशा सुधारणा करावयास हव्यात या मताकडे सुबुद्ध लोकमत झुकू लागले. सनातन्यांनी सुधारकांवर एखाद्या कृत्यासाठी बहिष्कार, ‘ग्रामण्य’ करावे आणि सुधारकांनी कधी माफी मागून वा कधी माफी न मागताच आपली नियोजित वाट चोखाळत राहावे, असे घडू लागले. शेवटी आगरकरांनी भाकीत केले होते त्याप्रमाणे कालांतराने बहिष्कार घालणाऱ्या शक्तीच बहिष्कृत झाल्या! स्त्रीजीवन सुधारण्याबाबतचे कायदे ब्रिटिशांकडून करून घ्यावेत की न घ्यावेत, या विषयावर टिळक आणि आगरकर यांची जाहीर वाग्युद्धे झाली. त्यातूनही लोकशिक्षण होत राहिले. विवाहाप्रसंगी स्त्रीचे वय काय असावे, लग्नानंतर गर्भाधान केव्हा व्हावे, इत्यादी ‘खासगी’ प्रश्नांची भरपूर खडाजंगी झाली. सासरी नांदावयास जाण्याचे नाकारून मुंबईत राहणाऱ्या रखमाबाईंनी नकळत्या वयात त्यांचा दादाजींशी झालेला विवाह, हा जाहीर वादाचा विषय केला. त्या निमित्ताने वृत्तपत्रांतून, व्याख्यानांतून हिंदुधर्म आणि स्त्री जीवन यांची भरपूर चिकित्सा झाली. स्त्री ही मालमत्ता की स्वतंत्र चैतन्यपूर्ण व्यक्ती, विवाह हा करार की संस्कार? असे मूलभूत महत्त्वाचे एक ना अनेक विषय! आजही न सुटलेले प्रश्न ! पण त्यांच्या चर्चेचा प्रारंभ या वेळी पुणे शहरात झाला. स्त्रियांसाठी घरगुती शिक्षण, प्राथमिक शाळा, यानंतरची पायरी होती ती म्हणजे माध्यमिक शिक्षण देणारी सार्वजनिक शाळा सुरू करण्याची. त्यासाठी उदारमतवादी इंग्रज आणि एतद्देशीय सुधारक एकत्र आले आणि त्यांनी ‘हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स’ ऊर्फ ‘हुजूरपागा’ ही शाळा सुरू केली (इ. स. १८८४). या शाळेत स्त्रियांसाठी कोणता अभ्यासक्रम असावा ह्याची वृत्तपत्रांतून भरपूर चर्चा झाली. जे मुलांना उपयुक्त ते मुलींसाठी उपयुक्त ठरणार नाही, स्त्रिया अजून शंभर वर्षे अर्थार्जन करणार नाहीत अशी भूमिका खुद्द लो. टिळकांचीच होती. हायस्कूलचे प्रवर्तक न्या. रानडे, डॉ. भांडारकर आदींनी टिळकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. पुढे मॅट्रिकच्या परीक्षेत हुजूरपागेच्या मुली इंग्रजी, गणित, संस्कृतसारख्या ‘पुरुषी’ विषयांसाठी ठेवलेली पारितोषिकेही पटकावू लागल्या. ती चर्चा मग थंडावलीच.
संदर्भ :- शहर पुणे खंड १