खासदार सुरेश कलमाडी निवडणूक लढवणार का नाही हा विषय कलमाडी समर्थकांकडून चर्चेत ठेवण्यात आला असला, तरी कलमाडी निवडणूक मैदानात उतरणार नाहीत, हे आता निश्चित झाले आहे. तशी अधिकृत घोषणा ते रविवारी (२३ मार्च) करण्याची शक्यता आहे.
कलमाडी गुरुवारी दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे समर्थकांनी स्वागत केले, ते पाहता कलमाडी देखील निवडणूक लढणार की काय अशी चर्चा राजकीय आणि विशेषत: काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली होती. त्या पाठोपाठ कलमाडी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी बैठकही झाली. कलमाडी यांचे निलंबन रद्द झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीनंतरही कलमाडी यांनी निवडणूक लढवणार का नाही याबाबत स्पष्टपणे न सांगता मी शनिवारी पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे व त्यानंतर माझा निर्णय जाहीर करीन असे सांगितले होते. गेले दोन दिवस कलमाडी समर्थकांकडून झालेले शक्तिप्रदर्शन पाहता काँग्रेसमध्येही कलमाडी नक्की काय करणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग आजही काँग्रेसमध्ये आहे हे लक्षात घेऊन पुण्यातील उमेदवार विश्वजित कदम आणि डॉ. पतंगराव कदम यांनीही शुक्रवारी कलमाडी यांची भेट घेतली.
कलमाडी यांच्या समर्थकांची तूर्त तरी मोठीच कुचंबणा झाली आहे. कलमाडी निवडणुकीला उभे राहिल्यास ते काँग्रेसमधून  निलंबित असल्यामुळे त्यांचे काम त्यांच्या समर्थकांना करता येणार नाही आणि उघडपणे काम केल्यास पक्षाकडूनही कारवाई होऊ शकेल, अशी भीती कलमाडी समर्थकांना आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणे अनेकांना गैरसोयीचे होईल, याकडे कलमाडी यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच काँग्रेसदेखील कलमाडींबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्याची शक्यता असून त्यानुसार त्यांचे निलंबन मागेही घेतले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या विरोधात तूर्त तरी काही करू नये असा विचार कलमाडी गटात झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार कलमाडी प्रत्यक्ष न लढता विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर करतील अशी शक्यता आहे. हा निर्णय ते रविवारी किंवा सोमवारी जाहीर करतील. तसा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांच्या समर्थकांचीही सोय होणार आहे. हे सर्वजण कलमाडी गटात असले, तरीही ते काँग्रेसमध्येही विविध पदांवर आहेत. त्यामुळे नक्की काय करायचे हा संभ्रम त्यांच्या गटातही आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कलमाडी यांनी कदम यांना पाठिंबा जाहीर करावा, असा पर्याय पुढे करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soft concisely of kalmadi
First published on: 23-03-2014 at 02:54 IST