मुंबईला जाण्यासाठी मोटारीत प्रवासी म्हणून बसलेल्या संगणक अभियंत्याला रस्त्यात चाकूचा धाक दाखवून त्याच्या एटीएममधून ४६ हजार रुपये काढून घेतले. दिवसभर फिरवत त्याच्या पत्नीला खात्यावर पैसे टाकण्यास लावून ते काढून घेतले. त्यानंतर त्या अभियंत्याला देहूरोडजवळ झाडाला बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी िहजवडी पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवताराम दयाराम चौधरी (वय ३२, रा. दत्तमंदिर रस्ता, वाकड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी हे इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांना मुंबईला काम असल्यामुळे ते शनिवारी पहाटे साडेपाच वाजता वाकड पुलाजवळून मुंबईला जाण्यासाठी एका मोटारीत बसले. काही अंतरावर गेल्यानंतर मोटारीतील हवा तपासायची असल्याचा बहाणा करून दोघेजण खाली उतरले. त्यांनी चौधरींना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्यांच्याकडील एटीएम कार्ड जबरदस्तीने घेऊन त्यांच्या खात्यावरील दहा हजार रुपये काढले. त्यानंतर चौधरी यांच्या पत्नीला फोन करून खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरेपर्यंत त्यांना त्याच भागात फिरवत राहिले. त्यांच्या पत्नीने टाकलेले ३५ हजार रुपये एटीएममधून काढले. त्यांना दिवसभर पुणे-मुंबई महामार्गावर फिरविले.
रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना देहुरोडजवळ डोळे आणि तोंडाला पट्टी बांधून एका झाडाला बांधून पळून गेले. पळून जाताना त्यांचा मोबाईल घेऊन गेले. पण, त्याचे सीमकार्ड खिशात टाकून गेले. आरोपी गेल्यानंतर चौधरी यांनी हालचाल करून स्वत:ला सोडवून घेतले. शेजारी एका दुकानदाराकडे जाऊन स्वत:चे सीमकार्ड टाकून मित्राला फोन लावून बोलवून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लुटणारे दोघे जण हे वीस ते बावीस वयोगटातील तरूण असून ते हिंदी बोलत होते. या दोन आरोपींचा शोध हिंजवडी पोलिसांनी सुरू केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. सूर्यवंशी करत आहेत.