शहरातील आर्थिक दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये तसेच झोपडपट्टय़ांमध्ये रस्त्यावरील दिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याची योजना महापालिकेतर्फे प्रथमच कार्यान्वित केली जात आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टय़ांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून रस्त्यावरील दिवे लावण्याचा प्रस्ताव असून या कामाची निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.
झोपडपट्टी विभागात सौरऊर्जेचा वापर करून वीजपुरवठा करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने ३ डिसेंबर २०१३ रोजी घेतला आहे. त्यानुसार आमदार दीप्ती चवधरी यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अशाप्रकारे वीजपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव  दिला होता. तसेच त्यांनी या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन समितीने हा विषय मंजूर केला असून एक कोटींच्या प्रशासकीय खर्चास मान्यता दिली आहे.
प्रशासकीय मान्यतेनंतर सौरऊर्जेचा वापर करून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये तसेच झोपडपट्टय़ांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या. त्यानुसार पवन क्विक सव्र्हिस यांची निविदा सर्वात कमी दराची असल्याने ती मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. चार कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरल्या होत्या. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून हे काम महापालिका करणार आहे. या योजनेत सुचवण्यात आलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये रस्त्यांवर एलईडी दिवे बसवणे, सौरऊर्जा तयार करण्यासाठीची आवश्यक पॅनेल बसवणे, आवश्यकतेनुसार खांब व अन्य सामग्री बसवणे आदी कामांचा या निविदेत समावेश आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे महापालिकेला रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांसाठी जो खर्च करावा लागतो, त्यात मोठय़ा प्रमाणावर बचत होणार आहे, असे सांगण्यात आले.
राज्य शासनाने या योजनेला मंजुरी दिली असून सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी आमदार निधीचा वापर करता येतो. त्यानुसार मी प्रस्ताव दिला होता. दिलेल्या यादीनुसार त्या त्या ठिकाणी सौरऊर्जेवर पथदिवे लागतील व त्यामुळे विजेच्या खर्चात बचत होईल, असे आमदार चवधरी यांनी सांगितले.