गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचा संचालक महेश मोतेवार याचा जामीन शुक्रवारी विशेष न्यायाधीश एस.जे.काळे यांनी फेटाळून लावला. पुण्यातील एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवार याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
सुनीता चंद्रकांत धनवे (रा. गणेशखिंड रस्ता) यांनी यासंदर्भात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मोतेवार याच्याविरुद्ध सन २० नोव्हेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.धनवे यांनी मोतेवार याच्या कंपनीत सन २००९ मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांना परतावा देण्यात आला नव्हता. त्यामुळे धनवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणात मोतेवार याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या वकिलांनी या गुन्ह्य़ात जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयाकडे दिला होता.
मोतेवार याच्या जामिनावर शुक्रवारी विशेष न्यायाधीश एस.जे. काळे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. देशभरात समृद्ध जीवनचे तेरा लाख ४५ हजार ११९ गुंतवणूकदार आहेत. त्यांना अद्याप १३५ कोटी रुपयांचा परतावा देणे बाकी आहे. गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन पैसे गोळा करण्यात आले आहेत. शासनाचा कर बुडविला असून मोतेवार याला तपासासाठी ओदीशा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोतेवार याला मदत करणाऱ्यांनादेखील अटक करायची आहे. आयकर खात्याच्या अहवालात समृद्ध जीवनच्या योजना बनावट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मोतेवार याचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील सुनील हांडे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने मोतेवार याचा जामीन फेटाळून लावण्याचे आदेश दिले.