पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी (२८ जुलै) सकाळी १० ते सायंकाळी पाच या कालावधीत महापालिके च्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या मुलाखती दिल्ली येथे होणार आहेत. त्या अनुषंगाने शहरामध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेले अनेक विद्यार्थी आहेत. या सर्वाना दिल्ली येथे जावे लागणार आहे. दिल्ली सरकारच्या नियमानुसार दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रवाशांनी आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र (करोना संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र) बाळगणे किं वा लशीची किमान पहिली मात्रा घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पहिली मात्रा घेतली आहे आणि ज्यांची दुसऱ्या मात्रेची मुदत झाली आहे अशा उमेदवारांना दुसरी मात्रा देण्याबरोबरच काही उमेदवारांना पहिली मात्रा देण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी सूचना प्रदेश भाजपकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांना करण्यात आली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्यानंतर ही विशेष मोहीम राबिवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पुणे विद्येचे माहेरघर आहे. देशविदेशातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात, याचा विचार करून पूर्व सराव परीक्षेसाठी दिल्ली येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही विशेष मोहीम आहे. विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परीक्षेसाठी पात्र असल्याची योग्य कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी के ले.