तिकीट तपासनिसांसह इतर विभागातही मनुष्यबळाची बोंबाबोंब असताना रेल्वेच्या पुणे विभागामध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागात मागील सहा महिन्यांमध्ये तिकीट तपासणीच्या नियमित प्रक्रियेमध्ये तब्बल ५३ हजारांहून अधिक फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले आहे. मनुष्यबळाची कमतरता असतानाही मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत असल्याने प्रत्यक्षात अशा प्रवाशांची संख्या अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुणे विभागामध्ये तिकीट तपासनिसांची संख्या कमी असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ातही तिकीट तपासनिसांची कमतरता भासते. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकल व पुणे-दौंड मार्गावरील गाडय़ांमध्ये अभावानेच तिकीट तपासनीस असतात. लोकलमध्ये पूर्वी दररोज तिकिटांची तपासणी केली जात होती. मात्र, सध्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस फिरकतही नाहीत. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नियमित तिकीट तपासणीमध्ये मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत आहेत.
पुणे विभागामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ५३ हजार २८८ विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ४१ हजार ४३६ प्रवाशांना पकडण्यात आले होते. ही संख्या पाहता यंदाच्या वर्षी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. पकडलेल्या या प्रवाशांकडून तब्बल पाच कोटी ९५ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दंडाची ही रक्कम ४५ लाखांनी जास्त आहे.
पुणे-लोणावळा लोकल व विविध स्थानिक गाडय़ांमध्ये तिकिटांची तपासणीच होत नाही. त्याचप्रमाणे अनेक स्थानकांवर तिकीट तपासनीस फिरकतही नाहीत. असे असतानाही कारवाईत मोठय़ा प्रमाणात फुकटे प्रवासी सापडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात फुकटय़ा प्रवाशांचा हा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.