झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) क्षेत्रामधील एका प्रार्थनास्थळाला नियमानुसार अनधिकृत दाखविणे व झोपडीधारकांना योजनेमध्ये पात्र ठरविण्यासाठी विकसकाकडे २५ लाख लाचेची मागणी करून त्यातील पाच लाखांचा दुसरा हप्ता स्वीकारताना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष रामचंद्र यादव (वय ४६) याला गुरुवारी रंगेहाथ पकडण्यात आले. कोथरूड येथील गाजलेल्या बनावट टीडीआर (हस्तांतर विकास हक्क) घोटाळ्यातही यादव हा आरोपी आहे. या घोटाळ्याच्या वेळी तो पालिकेच्या भूसंपादन विभागाचा उपायुक्त होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसआरएच्या कार्यालयात ही कारवाई केली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लोहियानगर येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या योजनेच्या विकसकाच्या जागेमध्ये एक बेकायदेशीर प्रार्थनास्थळ आहे. या जागेची मोजणी करून संबंधित प्रार्थनास्थळ बेकायदेशीर असल्याचे दाखविणे त्याचप्रमाणे योजनेत झोपडीधारकांना पात्र ठरविण्यासाठी यादव याने विकसकाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच लाख रुपयांची रक्कम त्याने पूर्वीच स्वीकारली होती.
उर्वरित रक्कम देण्यासाठी यादव याने तगादा लावला होता. त्यामुळे विकसकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यादव याच्याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील मुथा चेंबर्समधील एसआरएच्या कार्यालयात सापळा लावून यादव याला तक्रारदाराकडून पाच लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई करताना यादव याच्या शेजारी पोलिसांना आणखी एक बॅग सापडली. त्यात तीन लाख रुपये होते. त्याबाबतही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पैशांचा पाऊस पाडणारा अधिकारी!
शिरीष यादव याची पुण्यातील कारकीर्द यापूर्वीही वादग्रस्त ठरलेली आहे. पालिकेच्या भूसंपादन विभागाचा उपायुक्त असताना कोथरूड येथील बनावट टीडीआर घोटाळा प्रकरणात त्याला अटक झाली होती. अद्यापही हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. त्यात २८ फेब्रुवारी २००७ मध्ये तो राहात असलेल्या कोथरूडच्या स्वप्ननगरी सोसायटीतील इमारतीत पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता, त्याच्या पत्नीने घरात असलेली ९ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम स्वच्छतागृहाच्या खिडकीतून फेकून दिली होती. या नोटा उचलण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झाली होती. पैशाच्या या पावसाची त्या वेळी जोरदार चर्चा झाली होती. टीडीआरच्या प्रकरणात त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. बराच काळ निलंबित राहिल्यानंतर त्याला नागपूर येथे नियुक्त करून घेतले होते. त्यानंतर सातारा महामार्ग भूसंपादन विभागात त्याने काम केले. सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यात एसआरएमध्ये तो रूजू झाले होता.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
‘एसआरए’चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव याला लाच घेताना अटक
२५ लाख लाचेची मागणी करून त्यातील पाच लाखांचा दुसरा हप्ता स्वीकारताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष रामचंद्र यादव याला रंगेहाथ पकडण्यात आले.
Written by दया ठोंबरे

First published on: 02-10-2015 at 03:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sra shirish yadav take bribe arrest