परीक्षापत्रांमध्ये झालेला गोंधळ दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगलाच भोवत असून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक आणि तपशील जुळत नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत. सध्या हा गोंधळ निस्तरण्यासाठी कर्मचारी दिवस-रात्र राबत असले तरी दहावीचा निकाल लांबण्याच्या शक्यतेने अकरावीचे नियोजन कोलमडण्याच्या भीतीने विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत. त्यात भर म्हणजे या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा निकाल त्यांचाच असणार का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
गेली काही वर्षे जूनच्या पहिल्या आठवडय़ात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी ७ जूनला निकाल जाहीर झाला होता. मात्र, या वर्षी निकाल लांबला आहे. या वर्षी दहावीच्या प्रवेशपत्रांमध्ये गोंधळ झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना दोन प्रवेशपत्रे, एकापेक्षा अधिक परीक्षा क्रमांक अशा चुका प्रवेशपत्रांमध्येच झाल्या होत्या. झालेल्या गोंधळांचे परिणाम आता निकाल जाहीर करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक आणि नावे जुळत नसल्यामुळे निकाल तयार करण्यात अडचणी उद्भवल्याचे राज्यमंडळातील सूत्रांनी सांगितले.
मुंबई आणि पुणे विभागातही अशा प्रकारच्या काही तक्रारी समोर आल्या आहेत. या विभागांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे हा गोंधळ समोर येऊ शकला. मात्र, इतर विभागांमध्येही अशा प्रकारचे गोंधळ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अद्यापही राज्य मंडळाकडे सर्व विभागांचे निकाल आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हाती पडणाऱ्या निकालात त्रुटी राहू नयेत, यासाठी मंडळातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रवेशपत्रांचा गोंधळ आणि निवडणुकांमुळे उशिरा सुरू झालेले मूल्यांकन यामुळे या वर्षी निकाल लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या तोंडावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.