|| सुशांत मोरे
अपघातांची वाढती संख्या, बसचे बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे एसटीच्या शिवशाही वातानुकूलित बसकडे प्रवासी पाठ फिरवू लागले आहेत. मुंबई, पुणे प्रदेश वगळता अन्य शहरांत शिवशाहीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा एसटीला सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लावले. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये शिवशाहीचे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० एवढी होती. अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. त्यातच प्रवाशांना न घेताच निघून जाणे, वेळेत बस उपलब्ध न होणे, बिघाड होणे आणि बसची अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.
१ एप्रिल ते १५ डिसेंबर २०१९ अखेर एसटी महामंडळाचे भारमान गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी घटले आणि ते ५४ टक्क्यांवर आले. याचे प्रमुख कारण हे शिवशाही सेवेला प्रवाशांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद. शिवशाही सुरू होताच त्याचे प्रवासी भारमान ५४ टक्के होते. ते या वर्षांत घसरून सरासरी ५१ टक्क्यांवर आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. मुंबई प्रदेश आणि पुणे प्रदेश वगळता औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती प्रदेशात भारमान ५० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे.
भाडेतत्त्वावरील अथवा स्वमालकीच्या शिवशाही बस चालवण्याचा सरासरी खर्च ४२ रुपये प्रति किलोमीटर आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांत प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा सहन करूनही या बस चालवण्याचा अट्टहास महामंडळाकडून केला जात आहे.
आठ महिन्यांत ३९ रुपये प्रति किलोमीटर दराने सुमारे ३६१ कोटी रुपयांचा महसूल शिवशाहीकडून महामंडळाला प्राप्त झाला आहे. तोटा झाल्याने यंदा ४० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा महसूल महामंडळ प्राप्त करण्यात अपयशीच ठरले आहे.
‘शिवशाही’चे प्रदेशनिहाय भारमान (टक्क्यांमध्ये )
औरंगाबाद प्रदेश – ४९
मुंबई प्रदेश – ५८
नागपूर प्रदेश – ४२
पुणे प्रदेश – ५६
नाशिक प्रदेश – ४९
अमरावती प्रदेश – ४५
बस सेवेला आसनक्षमतेएवढे किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळताच त्यानुसार भारमान काढले जाते. एसटी बस सेवांना मिळत असलेला प्रतिसाद पुढीलप्रमाणे. (टक्केवारीत)
सेवा प्रकार प्रवासी भारमान
साधी बस ७२
रातराणी ६४
मिडी बस १४
सेवा प्रकार प्रवासी भारमान
- हिरकणी ६६
- शिवशाही ५१
- शिवनेरी ५०
सध्याच्या घडीला एसटीकडे ५५० स्वमालकीच्या आणि ४६४ भाडेतत्त्वावरील बस आहे. आणखी ३५० स्वमालकीच्या शिवशाही बस ताफ्यात येणार आहेत.