नववी, दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; अर्थशास्त्र आता गणित आणि भूगोलात

दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय यंदापासून बंद होणार आहे. त्यामुळे या वर्षी नववीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणिता’ऐवजी बीजगणीत-भूमितीची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर पुढील वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सामान्य गणिताची सूट मिळणार नाही. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषय देखील आता स्वतंत्रपणे शिकवण्याऐवजी त्याचा भूगोल आणि गणितात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून अभ्यासता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात हा यंदा नववीची आणि पुढील वर्षी दहावीची पुस्तके बदलत आहेत. नव्या रचनेमध्ये आता ‘अर्थशास्त्र’ हा विषय स्वतंत्रपणे शिकवण्यात येणार नाही. आतापर्यंत सामाजिक शास्त्र विषयांचे इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे चार भाग करण्यात येत होते. यंदापासून अर्थशास्त्र हा विषय भूगोल आणि गणित या विषयांत समाविष्ट करण्यात आला आहे.

सामान्य गणित विषय घेऊन दहावी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र असे असतानाही शाळांचा निकाल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणित’ घेण्याची सक्ती करण्याचे प्रकार समोर आले होते. असे विद्यार्थी अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरत. नियमबाह्य़ पद्धतीने सामान्य गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेसाठी पात्रतेचा प्रश्न निर्माण होत असे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाल्यामुळे प्रवेशातील हे तांत्रिक घोळ कमी होणार आहेत.

बदल काय?

विद्यार्थी मोठय़ा संख्येने गणितात अनुत्तीर्ण होतात, गणित विषयाची अनेकांना भीती वाटते, त्यांच्यासाठी शासनाने ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. २००५ पासून राज्य मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थी सामान्य गणिताचा पर्याय घेऊन विद्यार्थी परीक्षा देत होते. दरवर्षी एक ते दीड लाख विद्यार्थी हा विषय घेत होते. आता मात्र राज्य मंडळाने सामान्य गणिताचा पर्याय रद्द करून टाकला आहे. नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बीजगणित आणि भूमिती हे नियमित विषय घेऊनच परीक्षा द्यावी लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१७ -१८) नववीच्या वर्गासाठी आणि पुढील वर्षी (२०१८-१९) दहावीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी दिली.

इंग्रजी प्रथम भाषा

राज्याच्या अभ्यासक्रमांत त्रिभाषा सूत्री आहे. त्यानुसार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी ही प्रथम भाषा म्हणून आणि इंग्रजी ही तृतीय भाषा म्हणून अभ्यासणे बंधनकारक होते. मात्र आता नव्या रचनेत मराठी माध्यमाचे विद्यार्थी इंग्रजी प्रथम भाषा म्हणून अभ्यासू शकणार आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजीऐवजी मराठी प्रथम भाषा म्हणून अभ्यासता येईल.