गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये लवकरच सुरू करण्याचे संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पुण्यात दिले. ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

राज्यात करोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यामुळे मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने, मॉल, हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. मात्र ग्रंथालये सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांकडूनही ग्रंथालय सुरू करण्याबाबतची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. ‘राज्यातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्याशी नुकतीच चर्चा झाली आहे. ग्रंथालये सुरू करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत ग्रंथालये सुरू करण्यात येतील. राज्य सरकारकडून तसा निर्णय जाहीर करण्यात येईल,’ असे सामंत यांनी सांगितले.