मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच मूलभूत कामे करण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
डॉ. श्यामा घोणसे (समीक्षा), लक्ष्मीनारायण बोल्ली (ललित लेखक), डॉ, विनय सहस्रबुद्धे (मानव्यविद्या), दीपक घैसास (तंत्रज्ञान), राजेंद्र दहातोंडे (कृषिविज्ञान), प्रा. अरुण यार्दी (राज्याबाहेरील मराठी प्राध्यापकांचे प्रतिनिधी), रेणू दांडेकर (शिक्षण), अमर हबीब आणि उदय निरगुडकर (प्रसार माध्यम), डॉ. विद्यागौरी टिळक (विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रतिनिधी), अनय जोगळेकर आणि डॉ. भारत देगलूरकर (राज्याबाहेरील मराठी संस्थांचे प्रतिनिधी), सोनल जोशी-कुलकर्णी (भाषाविज्ञान), डॉ. रंजन गर्गे (विज्ञान), नंदेश उमप (लोकसंस्कृती), डॉ. अविनाश पांडे (विद्यापीठातील भाषाविज्ञान विभागाचे प्रतिनिधी), श्रीराम दांडेकर (उद्योग), कौशल इनामदार (रंगभूमी-प्रयोगकला-चित्रपट), शिवाजीराजे भोसले (बृहन्महाराष्ट्राचा प्रतिनिधी, रेखा दिघे (जागतिक मराठी परिषदेचा प्रतिनिधी) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांचा अशासकीय सदस्यांमध्ये समावेश आहे.
संस्थेच्या घटनेनुसार अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नवीन सदस्यांची नियुक्ती होईपर्यंत तेच अशासकीय सदस्य राहतात. मागील काळामध्ये असलेल्या अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कालावधी २००९ मध्ये संपुष्टात आला होता. मात्र, नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे पूर्वीचेच सदस्य काम पाहत होते.