मेट्रो प्रकल्पांतर्गत शहरात आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परिणामी बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तसेच नदीपात्रात राडारोडा पडला आहे. परिणामी रस्त्यावर वाहतूक खोळंबण्यासह नदीचे पात्र आक्रसण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. पावसाळ्यातील पूर परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (महामेट्रो) पावसाळ्यापूर्वीची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महामेट्रोने मे महिना अखेर पर्यंत स्वतंत्र आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

महामेट्रोकडून शहरात प्रस्तावित मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असली, तरी राडारोडा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग डेक्कन जिमखाना ते महापालिकाभवन समोरील मुळा नदीपात्रातून जाणार आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. या वेळी नदीच्या पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, भराव टाकले जाणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नदीपात्रालगत सुरु असलेल्या कामाचा राडारोडा तेथेच पडला असून नदीपात्रात भराव तयार झाले आहे. पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती पाहता किंवा खडकवासला धरणसाखळीतून नदीत पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पाण्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून पूर परिस्थिती ओढावू शकते.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांनी पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महामेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीची कामे तात्काळ पूर्ण करत मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे, अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक , गार्ड तैनात करावे, नदीपात्रात तसेच रस्त्यालगत पडलेला राडारोडा तत्काळ काढून घ्यावा अशा विविध सूचना दिल्या आहेत. तसेच कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस, महानगरपालिका विभागांशी समन्वय साधून एक आराखडा तयार करून मे महिनाअखेर पर्यंत तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, असे आदेश दिले आहेत.