बँकांच्या कर्जांच्या दहापट मालमत्ता माझ्याकडे आहेत. याद्वारे तीन महिन्यांत मी एकाच वेळी बँकांची कर्जे आणि गुंतवणूकदारांचे पैसे फेडून दाखवतो. मात्र, त्याआधी मी बदमाश असल्याचा प्रचार थांबवा. कारण, असा प्रचार केल्यास कोण मला पैसे देईल? माझ्या मालमत्तांवर शंका असल्यास हायकोर्टाच्या देखरेखीखाली त्यांची विक्री करा, अशी मागणी सुनावणी आधीच डीएसकेंनी न्यायालयाकडे केली आहे. अटक टाळण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत हायकोर्टाने डीएसकेंना दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

डीएसके म्हणाले, गुंतवणूकदारांचे पैसे फेडण्यासाठी मी मालमत्ता विकायला गेलो तर मला मालमत्ता विकू दिली जात नाही. डीएसकेंची मालमत्ता विकत घेतली तर ती जप्त होईल, असा प्रचार केला जात आहे. याद्वारे काहींचा आम्हाला उध्वस्त करण्याचा डाव आहे. यामागे काही राजकीय गटांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

डीएसकेंवर अद्याप कारवाई का करण्यात येत नाही. डीएसकेंना अटक करण्यापासून संरक्षण मिळाले तर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करुन पैसे परत मिळावेत यासाठी राज्य सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. आमच्याबरोबर केला तसाच खेळ डीएसके आता कार्टातही खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुण्यातील चित्तरंजन वाटीकेत भरणाऱ्या माहिती अधिकार कट्टा येथे जमलेल्या या गुंतवणूकदारांनी रविवारी ही मागणी केली.