पिंपरी: पावसाळय़ापूर्वी ड्रेनेज स्वच्छतेचे काम पूर्ण करावे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पिण्याच्या पाण्याची समस्या तत्काळ सोडवावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवा, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी शहरातील नागरिकांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
पिंपरी पालिकेच्या वतीने शहरातील नागरिक व प्रशासनात सुसंवाद राखतानाच तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होत आहेत. या आठवडय़ातील सभेत जवळपास १०० तक्रारी प्राप्त झाल्या. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह श्रीकांत सवणे, मकरंद निकम, प्रशांत जोशी, अजय चारठणकर, सतीश इंगळे, चंद्रकांत इंदलकर, संजय कुलकर्णी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सभा पार पडल्या.
उंच भागात राहणाऱ्या नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. रस्तारूंदीकरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे, व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे. धोकादायक झाडांची छाटणी करावी. पालिकेच्या आरक्षित जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी. रस्त्यावरील बेकायदा वाहनतळांवर कारवाई करावी. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारणी करावी, अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून केल्या आहेत.