पुणे : बिबवेवाडी-कोंढवा परिसरातील महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थिनीला टेम्पोने धडक दिली. उपचारादरम्यान तिचा  मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आली.

ऐश्वर्या संतोष धांडेकर (वय १९, रा. कोंढवा) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये ‘बीबीए’ द्वितीय  वर्षांत शिक्षण घेत होती.

या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असे ऐश्वर्याचे मामा अमित जाधव यांनी सांगितले.

२१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याची आई दीपाली यांनी दुपारी तिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात सोडले. त्यानंतर आवारात एका टेम्पोने तिला धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. दरम्यान, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, तिचा सोमवारी (२ डिसेंबर) मृत्यू झाला.

संबंधित टेम्पोतून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे आणण्यात आले होते, अशी माहिती मिळाली. ऐश्वर्याच्या मागे आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.