मागण्या गांभीर्याने  घेत नसल्याचा आरोप

नागपूर :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पात्र उमेदवारांना महाज्योतीने बार्टी आणि सारथीप्रमाणेच ऑफलाईन प्रशिक्षण आणि विद्यावेतन द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थी सोमवारी पुन्हा महाज्योती कार्यालयात धडकले.  त्यांनी  कार्यालयासमोर निदर्शने के ली. महाज्योती प्रशासन आमच्या मागण्यांना गांभीर्याने का घेत नाही, असा या  विद्यार्थ्यांचा सवाल होता.

महाज्योतीची स्थापना ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी झाली आहे. मात्र महाज्योतीचे प्रशासन विद्यार्थीभिमुख योजना रावबत नसल्याचे दिसून येते. राज्य शासन सारथी अंतर्गत मराठा समाजाच्या उमेदवारांना आणि बार्टी अंतर्गत एससी/एसटी समाजाच्या उमेदवारांना यूपीएससी आणि एमपीएससीच्या तयारीसाठी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून ऑनलॉईन/ ऑफलाईन क्लासेस सुविधेसह विद्यावेतन देते. सारथीकडून यूपीएससी उमदेवारांना १३ हजार रुपये आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्यांना आठ हजार रुपये देते. बार्टी एमपीएसपी विद्यार्थ्यांना १० हजार विद्यावेतन देते.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी महाज्योती आहे. पण, महाज्योतीकडून उमेदवारांना फक्त ऑनलाईन क्लासेसची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच  विद्यावेतनाचीही तरतूद  नाही. हा ओबीसी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांशी भेदभाव आहे. विद्यावेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करता येणे शक्य होणार नाही. ते स्पर्धेत मागे पडतील. त्यामुळे ऑनलाईन क्लासेसची सुविधा अपेक्षेप्रमाणे फायदेशीर ठरणार नाही. आता शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. महाज्योतीने सुद्धा ऑफलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच मराठी भाषेत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी  महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांना आज केली. डांगे यांनी मात्र विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून लावली. एवढेच नव्हेतर जमत नसेल तर परीक्षेची तयारी करू नका असा कठोर सल्लाही दिला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

५० ते ६० विद्यार्थ्यांना चर्चेला बोलावले जाऊ शकत नाही. त्यातील तीन विद्यार्थ्यांनी चर्चेला यावे, अशी सूचना केली. त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आणि त्यांचे निवदेन स्वीकारले. त्यांची मागणी संचालक मंडळासमोर मांडण्यात येईल.

– प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.