यंदापासून अंमलबजावणी; पहिलीसाठी पाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळाप्रवेश
शाळाप्रवेशासाठी किमान वयाच्या निकषाची अंमलबजावणी करण्याचा गेल्यावर्षी शासनाने घेतलेला निर्णय या शैक्षणिक वर्षांपासून अमलात येणार आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्याच मुलांना यावर्षी पूर्वप्राथमिक वर्गासाठी प्रवेश मिळणार आहे.
धोरणाबाबत केंद्रीय शिक्षण मंडळ, आंतरराष्ट्रीय शिक्षणमंडळे आणि राज्यमंडळ यांच्याशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वयाबाबत सुसूत्रता नव्हती. गेल्यावर्षी शाळाप्रवेशासाठीचे वयाचे निकष निश्चित केले. पूर्वप्राथमिक वर्गासाठी साडेतीन वर्षे पूर्ण आणि पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असा आदेश शासनाने जाहीर केला. मात्र गेल्यावर्षी हा निर्णय शाळांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर झाला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. यंदापासून शाळा प्रवेशासाठी वयाचे निकष अमलात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे; मात्र आता पूर्वप्राथमिकसाठी तीन वर्षे पूर्ण असा निकष असेल. त्यामुळे येत्या ३१ जुलैपर्यंत तीन वर्षे पूर्ण झालेल्याच मुलांना शाळेत प्रवेश मिळणार आहे; मात्र पहिलीसाठी यावर्षीही किमान वयाची अट ही पाच वर्षे अशीच आहे.
पुढील वर्षीपासून पहिलीसाठी वयाचे निकष म्हणजे २०१७ – १८ या शैक्षणिक वर्षांसाठी पाच वर्षे ४ महिने असा असणार आहे. त्यानंतर दरवर्षी पहिलीचा किमान वयाचा निकष पुढील दोन वर्षे चार महिन्यांनी वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ साठी पाच वर्षे ८ महिने आणि २०१९ – २० यावर्षी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीला प्रवेश मिळणार आहे.
आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांचे काय?
सध्या बहुतेक खासगी शाळांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत वा अंतिम टप्प्यांत आहेत. यंदा वयाच्या निकषाची अंमलबजावणी होणार असल्याचे शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक शाळांनी अडीच वर्षांच्या मुलांनाही पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश दिला आहे. या मुलांना आता शाळेत एक वर्ष अधिक काढावे लागणार आहे. राज्यमंडळ वगळता बाकीच्या काही शिक्षणमंडळाच्या शाळा या एप्रिल महिन्यातच सुरू होतात. अशा बहुतेक शाळा ३१ मार्चपर्यंतचे वय शाळाप्रवेशासाठी गृहीत धरतात. त्याअनुषंगाने सध्या प्रवेश दिले असल्याचे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students who have completed five years of admission they get admission
First published on: 03-01-2016 at 03:01 IST