आपण ज्या खडकावर राहतो, त्या काळ्या पाषाणाच्या (बेसॉल्ट) खाली कोणता खडक असेल, हे किती तरी दशकांपासून असलेले कोडे आता सुटले आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी सुमारे दीड किलोमीटर खोलीपर्यंत ‘ड्रिल’ करण्यात आले आहे. त्याद्वारे पहिल्यांदाच बेसॉल्टचा तळ गाठणे शक्य झाले असून, आपल्या खडकाच्या खाली ग्रॅनाइट व इतर रूपांतरित खडक असल्याचे प्रत्यक्ष पुरावे मिळाले आहेत.
कोयना व वारणा धरणांच्या परिसरात होणाऱ्या भूकंपांची नेमकी कारणे शोधणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या हाती घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या प्रकल्पात हैदराबाद येथील ‘नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट’ (एन.जी.आर.आय.) ही संस्था व तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव हे मुख्य भूमिका बजावत आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात कोयना व वारणा धरणांच्या परिसरात दहा ठिकाणी सुमारे दीड किलोमीटर खोलीपर्यंत ‘ड्रिल’ घेण्यात येत आहेत. त्यातून खडकाबाबत व जमिनीखालील कमकुवत क्षेत्रांबाबत मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आणखी सात किलोमीटर खोलीपर्यंत ‘ड्रिल’ घेण्यात येणार आहेत. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात कोयना धरणाजवळ रसाटी (जिल्हा- सातारा) आणि वारणा धरणाजवळ उदगिरी (जिल्हा- कोल्हापूर) या ठिकाणी ‘ड्रिल’चे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्य़ातील कुंडी व नायरी येथेही हे काम प्रगतिपथावर आहे.
याबाबत डॉ. राव यांनी सांगितले की, या ठिकाणी घेतलेल्या ‘ड्रिल’मधून खालच्या खडकांचे नमुने व अधिक माहिती मिळाली आहे. हे करत असताना पहिल्यांदाच बेसॉल्टच्या तळापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आपला काळा पाषाण हा ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून बाहेर पडलेल्या लाव्हारसापासून तयार झाला आहे. त्याच्या खाली नेमके कोणते खडक असतील, याबाबत भूशास्त्रज्ञांना उत्सुकता होती. मात्र, आपल्या भागात इतक्या खोलवर ड्रिलिंग न झाल्याने हे कोडे सुटलेले नव्हते. त्याबाबत केवळ काही अंदाज वर्तवले जात होते. आता मात्र तिथे प्रत्यक्षात रूपांतरित प्रकारचे खडक असल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या नमुन्यांमध्ये त्यात ‘ग्रॅनाइट’ व ‘नाइसेस’ या रूपांतरित प्रकारचे खडक आढळले आहेत. पुढील ‘ड्रिल’ घेतली जातील, तेव्हा खाली असलेल्या खडकांबाबत अधिक माहिती मिळेल.
समुद्रसपाटीपासून
३०० मीटपर्यंत!
आपल्या काळ्या पाषाणाची जाडी किती आहे, याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जायचे. त्याची जाडी साधारणत: तीन हजार मीटर असावी, असे बोलले जायचे, पण या प्रयोगाने ते चूक ठरवले आहे. रसाटी येथे तो ९३३ मीटर खोलीपर्यंतच आढळला आहे, तर उदगिरी येथे तो खाली ९०० मीटपर्यंत आहे. इतर दोन ठिकाणीही तो वेगवेगळ्या खोलीपर्यंत आहे. सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीच्या खाली ३०० मीटपर्यंत काळ्या पाषाणाची सीमा आहे,  हे या सर्व नोंदींवरून स्पष्ट होत आहे. त्याच्या खाली ग्रॅनाइट व इतर रूपांतरित खडक आढळतात.
– डॉ. एन. पूर्णचंद्र राव,
वरिष्ठ शास्त्रज्ञ