हृदयाची धमनी जवळजवळ किंवा पूर्णत: बंद होण्याच्या ‘क्रॉनिक टोटल ऑक्ल्युजन’ या विकारावर जहाँगीर रुग्णालयात रविवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करतानाचे चित्रीकरण मुंबईतील ‘रेनेसान्स कन्व्हेन्शन सेंटर’ येथे डॉक्टरांना पाहण्यासाठी ‘लाइव्ह’ दाखवले गेले.
प्रसिद्ध हृदयशल्यचिकित्सक डॉ. जे. एस. दुग्गल व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. डॉ. मंदार देव आणि डॉ. अजित मेहता यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. रुग्णालयाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जॉर्ज इपन या वेळी उपस्थित होते.
या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देशातील तसेच जपानमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाहिले. डॉ. मेहता म्हणाले, ‘‘धमनीच्या आतल्या बाजूस अतिरिक्त कोलेस्टेरॉल साठत गेल्याने धमनी बंद होण्याची क्रिया सुरू होते. धमनीचा बंद झालेला भाग मऊ असेल, तर त्यासाठी ‘रुटिन अँजिओप्लास्टी’ उपयुक्त ठरू शकते. मात्र धमनी कडक झाल्यास क्रॉनिक टोटल ऑक्ल्युजन शस्त्रक्रिया हा बायपास शस्त्रक्रियेपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो. या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्ण घरी देखील जाऊ शकतो.’’