१ जानेवारीपर्यंत कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागला नाही तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दिला. कोपर्डीच्या घटनेला दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. तरीही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. नराधमांना जरब बसेल अशा प्रकारचा निकाल आत्तापर्यंत लावायला हवा होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आश्वासन विसरले आहेत अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच हा लवकरात लवकर हा खटला निकाली लागला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.

काय आहे कोपर्डी प्रकरण?
१३ जुलै २०१६ रोजी अहमदनगरच्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील निर्भया प्रकरण म्हणून हे प्रकरण गाजले. या बलात्कार आणि हत्या प्रकरणात जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली. तसेच कोपर्डीतील पीडीत मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभरात मूक मोर्चेही काढले होते.

विधानसभेतही हा मुद्दा गाजला होता, त्यावेळी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर पोहचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. विरोधकांनीही यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या याच आश्वासनाचा त्यांना विसर पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे आणि १ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.