संविधान ही भारतीयांची ओळख असून संविधानाच्या विरोधात जर चुकीचे काम होत असल्यास पंतप्रधानांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत पोलीस यंत्रणेने त्यांना शिक्षा दिल्यास पुन्हा एकदा देशात संविधान जाळण्याचा कोणी विचारही करणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले.

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यावर त्या घटनेचा निषेध देशभरातून करण्यात येत आहे.

पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालय रस्त्यावर तरुणांनी एकत्र येत संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून ‘मेरा संविधान मेरा अभिमान’ या निषेधपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी जिंदाबाद, जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान के सन्मानमे हम उतरे मैदान मे, इन्क्लाब इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या.