स्काय डायव्हिंग, हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके, टेंट पेगिंग याबरोबरच अश्वारोहणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके ‘सदर्न कमांड सुवर्णचषक’ अश्वारोहण शर्यतीच्यावेळी रविवारी सादर झाली. या शर्यतीमध्ये सदर्न कमांड सुवर्णचषक अश्वारोहक डी. के. आशिष आणि ‘सुप्रीम स्टार’ या अश्वाने जिंकला, तर ‘फिल्ड मार्शल माणेकशॉ स्मृती चषक’ अश्वारोहक सी. एस जोधा आणि ‘सेल्सिअस’ या अश्वाने जिंकला.
लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे ‘सदर्न कमांड सुवर्णचषक’ अश्वारोहण स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. अश्वारोहण शर्यतीचा थरार नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) छात्रांनी सादर केलेली अश्वारोहणाची प्रात्यक्षिके आणि सैन्यातील जवानांनी सादर केलेली पॅरा मोटरिंग, स्काय डायव्हिंग यांसारख्या प्रात्यक्षिकांनी वाढवला. सुभेदार खेमराज यांच्या नेतृत्वाखाली ‘पॅरा मोटार’चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कर्नल ए. के. ऋषी यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेणाऱ्या गटाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मेजर बी. एस. राठोड यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या छात्रांनी अश्वारोहणाची प्रात्यक्षिके सादर केली.
या वेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग उपस्थित होते. ‘अश्वारोहण या क्रीडा प्रकाराशी लष्कराचा सुरूवातीपासूनच खूप जवळचा संबंध आहे. जगभरातील अनेक युद्धांमध्ये घोडय़ांचा वापर करण्यात आला होता,’ असे मत सिंग यांनी या वेळी व्यक्त केले.