पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात स्वप्नील पाटील राज्यात आणि मागासवर्गीयातून प्रथम, तर अनुजा फडतरे यांनी महिलांतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या प्रक्रियेत आयोगाने चार महिन्यांत ३ हजार ६०० मुलाखती पहिल्यांदाच घेतल्या.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या मुलाखती ४ ऑक्टोबर ते २ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. अंतिम निकालात १ हजार १४५ पदांपैकी अनाथ आणि श्रवणशक्तीतील दोष या प्रवर्गासाठी आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्याने संबंधित दोन पदे रिक्त ठेवून १ हजार १४३ पदांवर पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली.

उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अधीन राहून उमेदवारांची अंतिम निकालात शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी किंवी चुकीची आढळल्यास किंवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीवेळी न केल्यास शासन स्तरावरील अधिसूचनेनुसार दावे तपासताना, अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध कारणांमुळे सदर भरती प्रक्रिया रखडलेली होती. आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आणि तीन सदस्यांनी प्राधान्याने चार महिन्यांत ३ हजार ६०० उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. आयोगाकडून वर्षभरात सर्वसाधारणपणे चार हजार मुलाखती घेतल्या जातात. मात्र पहिल्यांदाच एवढय़ा कमी कालावधीत ३ हजार ६०० मुलाखती घेण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी