भल्या पहाटे रसिक प्रेक्षकांची गर्दी, नामवंत गायकांना प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्णसंधी, अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे खुसखुशीत निवेदन, ढोलकी-ड्रम-बासरी-घुंगरांसह विविध वाद्यांचा दणदणाट, शिट्टय़ा-टाळ्यांची दाद, ‘वन्स मोअर’ची फर्माइश अशा उत्साही वातावरणाचे चित्र शनिवारी निगडी-प्राधिकरणात दिसून आले. निमित्त होते, उपमहापौर राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरपहाट’ कार्यक्रमाचे.
प्राधिकरणातील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या ‘स्वरपहाट’ मध्ये आदर्श शिंदे, ऊर्मिला धनगर, जान्हवी प्रभू -अरोरा, अमर ओक, जयदीप भडोळकर आदींनी सादर केलेल्या विविध गाण्यांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. सर्वाधिक बहार आणली ती पुष्कर श्रोत्री यांच्या निवेदनाने. आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, पालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
आदर्श शिंदे याने आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. आजोबांमुळे गायनाची आवड निर्माण झाली. आपल्याकडे गायनाची क्षमता असल्याचे त्यांनीच सुरूवातीला ओळखले व तशी संधीही दिली. आपल्या नावावर अनेक हीट गाणी असली तरी आजही आजोबांची गाणी गाताना भीती वाटते, मी अस्वस्थ होतो. सर्वसामान्य नागरिकांच्या रक्तात भिनलेल्या अवीट गोडीच्या त्या गाण्यांना आपण योग्य न्याय देऊ शकू की नाही, अशी धास्ती वाटते, अशी भावना त्याने व्यक्त केली. विद्या बालनच्या ठसकेबास नृत्यामुळे हीट झालेल्या ‘मला जाऊ दे’ या गाण्याची निर्मिती व विद्या बालनचा सहवास याविषयी ऊर्मिला धनगर हिने आठवणी सांगितल्या. ओक यांच्या बासरीवादनास तसेच ढोलकी-घुंगराच्या जुगलबंदीस चांगलीच दाद मिळाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याने समारोप झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarapahaat in nigdi celebrated in jubilation
First published on: 04-11-2013 at 02:42 IST