कंठसंगीत असो किंवा नृत्याविष्काराची मैफल या कार्यक्रमांची रंगत वाढवितानाच एकलवादनाचे स्वतंत्र वाद्य ही वैशिष्टय़े असलेल्या तबल्याचे बोल आता संहिता रूपामध्ये शब्दबद्ध झाले आहेत. नव्या वर्षांरंभदिनी पुण्यामध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू होत असताना औरंगाबाद येथे ‘परिपूर्ण तबला लिपी’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
औरंगाबाद येथील तबलावादक संजीव शेलार यांनी ही लिपी विकसित केली असून ‘परिपूर्ण तबला लिपी’ या पुस्तकाला राजहंस प्रकाशनाचे कोंदण लाभले आहे. अभिजात परंपरा लाभलेले शास्त्रीय संगीत गुरू-शिष्य परंपरेतून वर्धिष्णू झाले आहे. यामध्ये गुरूकडून मौखिक परंपरेने झालेले विद्यादान शिष्याकडून त्याच्या शिष्यांकडे हस्तांतरित होते. संगीतातील पूर्वसुरींनी लिहून ठेवलेल्या रचना विशिष्ट लिपीच्याअभावी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. ही बाब ध्यानात घेत संजीव शेलार यांनी संशोधन करून तबलावादनाच्या बोलांचे जतन करण्यासाठी लिपी विकसित केली आहे.
संजीव शेलार म्हणाले, अभिजात संगीतातील पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्याबरोबरच त्यातील प्रवाहीपण टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. तबलावादन करताना कलाकार एकच कायदा दरवेळी नव्या पद्धतीने वाजवू शकतो. मात्र, तबल्याची रचना एकसारखी नसल्याने हा कायदा तसाच वाजेल असे नाही. ही मर्यादा ध्यानात घेऊन बंदिशीची रचना लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न प्राथमिक स्तरावरचा असून हे लेखन आणखी परिणामकारक झाले पाहिजे असे वाटते. तबल्याचे शास्त्र आणि बंदिशीच्या रचना पूर्णपणे गणितावर आधारित आहेत. या प्रचलित लिपीमध्ये शब्द तोडून लिहावा लागतो. त्यामुळे रचनेचे सौंदर्य हरवण्याची शक्यता असते. या पुस्तकामध्ये भाषेसाठी लिपी नाही तर, लिपीसाठी भाषा वापरली आहे. तबलावादनाचा साकल्याने अभ्यास करून त्यातील शब्दसमूह न तोडता रचनेची जाती आणि लय स्पष्टपणे दाखविता येते.
शास्त्राच्या अभ्यासातून पुस्तकनिर्मिती
संजीव शेलार म्हणाले, मी उशिराने म्हणजे वयाच्या ४५ व्या वर्षी तबलावादन शिकण्यास सुरुवात केली. पं. जी. एल. सामंत यांचे नातू अभय सामंत यांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतले असून सध्या मी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे मार्गदर्शन घेत आहे. मात्र, मला तबलावादनापेक्षाही वादनाचे शास्त्र जाणून घेण्याची गोडी लागली. मग त्यावर भर देत अभ्यास केला. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रोत्साहनामुळेच मी या पुस्तकाचे लेखन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसंगीतMusic
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabla lipi in book format
First published on: 27-12-2014 at 02:45 IST