‘‘गेल्या पन्नास वर्षांपासून आपण अनेक खुळ्या कल्पना जपत आलो आहोत. प्रखर समाजवादाचे गोडवे गाणारे देशही आता बदलले आहेत. या सगळ्याचा वेध घेऊन पावले उचलणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटारचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी शनिवारी भारतीय छात्र संसदेमध्ये व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारत सरकारचे क्रीडा व युवककल्याण मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भारतीय छात्र संसदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये ‘उपभोक्तावाद भारताला उपभोगत आहे का?’ या विषयावर फिरोदिया यांच्यासह स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख निमंत्रक स्वामीनाथन गुरुमूर्ती, आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी. एस. एन. राजू, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गजानन काकडे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी फिरोदिया म्हणाले, ‘‘उपभोक्तावाद या शब्दाकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण झालेल्या अनेक वस्तू या ‘उपभोक्तावाद’ नाहीत. मात्र, त्याचा अतिरेकी वापर हा निश्चितच उपभोक्तावाद आहे. आपण आधुनिक व्हायचे की पाश्चात्त्य हे आपण ठरवायला हवे.’’ स्वामिनाथन गुरुमूर्ती म्हणाले, ‘‘मोठय़ा राष्ट्रांनी उपभोक्तावादाला अतिरेकी महत्त्व दिले, त्याचे परिणाम या देशांमधील सामाजिक समस्यांवरून दिसतच आहेत. उपभोक्तावादाचा अतिरेक हा समाजकारण आणि अर्थकारण बिघडवणारा असतो.’’
चौथ्या सत्रामध्ये ‘लोकशाही विकाऊ झाली आहे का?’ या विषयावर बोलताना पंतप्रधान कार्यालयाचे माजी सचिव सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोणत्याही नेत्यावर किंवा पक्षावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. ‘आप’ ने दिल्लीत यश मिळवून प्रस्थापितांना धक्का दिला आहे. वयापेक्षा विचारांनी आणि दृष्टिकोनाने तरुण असलेल्यांनी आता देशाच्या प्रगतीचा मार्ग लोकशाहीवादी केला पाहिजे.’’ या सत्रामध्ये जय नारायण व्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. एस. राजपुरोहित, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, डीएनए मुंबईचे संपादक सी. पी. सुरेंद्रन आदींनी विचार व्यक्त केले.
संसदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये ‘राजकीय नेतृत्व – युवा भारताच्या अपेक्षा’ या विषयावर इस्लामिक विचारवंत मौलाना सय्यद कलबे रशीद रिझवी, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शाह, इंडियन र्मचट चेंबरचे उपाध्यक्ष प्रबोध ठक्कर, न्यूरो सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रामध्ये ‘चित्रपट, संगीत, क्रीडा भारतीयांना एकत्रित ठेवणारे घटक’ या विषयावर प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित ठकार यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.