पर्यावरणासंबंधीच्या चर्चासाठीची व्यासपीठे पुण्याला नवीन नाहीत. आता निसर्गप्रेमींना पर्यावरणाविषयीचे प्रश्न मांडण्यासाठी एक चावडीही उपलब्ध होणार आहे. तळजाई टेकडीवर महिन्यातून दोन वेळा ही पर्यावरण चावडी भरणार असून शुक्रवारी सकाळी वसुंधरा दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे.
या उपक्रमात पर्यावरणाशी निगडित प्रश्नांवर लोकसहभागातून चर्चा करून उपाय सुचवले जाणे अपेक्षित असल्याचे ‘बायोस्फीअर्स’चे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. ‘टेलस’ आणि ‘बायोस्फीअर्स’ या संस्था, वन विभाग आणि पुणे पालिका यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण चावडीत प्रत्येक वेळी वेगळ्या हवा, पाणी, वातवरणबदल, जैवविविधता अशा विविध विषयांवर चर्चा होणार असून काही ठरावही केले जाणार आहेत. या चर्चेसाठी सर्वाना खुला प्रवेश असून धोरणांच्या निर्मितीत सहभाग असलेल्या मंडळींबरोबरच राजकीय व्यक्तींनाही त्यात सहभागी होता येणार आहे.
पुणेकर म्हणाले, ‘केवळ पर्यावरण तज्ज्ञच नव्हे तर नागरिक, शेतकरी आणि आदिवासी बांधव देखील चावडीवर आपले अनुभव मांडू शकतील. पर्यावरणविषयक कट्टे आताही पुण्यात भरतात, परंतु बऱ्याच ठिकाणी त्या नावाखाली पर्यावरण सहलींची प्रसिद्धी केली जाते. या परिस्थितीत सामान्यांमध्ये पर्यावरण जागृती करणारे व वैचारिक दिशा देणारे व्यासपीठ सुरू करण्याचा उद्देश आहे.’
तळजाई टेकडीवर पाचगाव-पर्वती वनविहारातील निसर्ग परिचय केंद्रात शुक्रवारी सकाळी ७ ते ८ या वेळात पहिली चावडी भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार असून ‘वृक्ष लागवड व संवर्धन’ या विषयावर या वेळी चर्चा होईल.

 ‘चावडीतील चर्चेतून ज्या राबवण्याजोग्या गोष्टी समोर येतील, त्याद्वारे पालिकेच्या कामाला दिशा मिळू शकेल. याआधी शहरातील दुर्मीळ झाडांवर फलक लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे आणखी काही ठिकाणी दुर्मीळ झाडांचे रोपण करता येईल का, अशा सकारात्मक बाबी पुढे आल्यास त्यावर काम केले जाईल.’
    मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका