पुणे : मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नसल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून, ४ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमी अभिलेखकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणखी एक सुकाणू समिती; शालेय शिक्षणमंत्र्यांसह एकूण बारा सदस्यांचा समावेश

‘तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेचे ४२ टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने कळविले आहे. कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कोठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच एका दिवशी सुमारे ६० हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे. त्यामुळे या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही,’ अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

हेही वाचा >>> सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यालयातून सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तहसील मुख्यालयी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना काहीही अडचण, समस्या असल्यास तातडीने या मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय सोमवारी (४ सप्टेंबर) काही कारणांनी परीक्षेला पोहोचला आले नसल्यास आणि वेळेत संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असल्यास अशा उमेदवारांची जिल्हानिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

परीक्षेचा अंतिम टप्पा ४ ते १४ सप्टेंबर (७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या दिवशी परीक्षा नाही)