पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली असून, २७ ते ३० मे, २ ते ५ जून या कालावधीत ही चाचणी घेतली जाणार आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी अनिवार्य आहे. या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी राज्यभरातील २ लाख ३६ हजार ५९१ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र दुबार अर्ज, शुल्क न भरलेले उमेदवार यांचे अर्ज वगळता २ लाख २७ हजार २२९ उमेदवारांचे अर्ज अंतिम करण्यात आले आहेत.
परीक्षा परिषदेच्या नियोजनानुसार २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. मात्र, या नियोजनात बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २७ मे ते ५ जून या कालावधीत दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. उमेदवारांनी http://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे ओक यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांच्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांबाबत उमेदवारांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या अन्य परीक्षांच्या तारखा विचारात घेऊन अभियोग्यता चाचणीची तारीख दिली जाणार आहे. उमेदवारांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने चाचणीचे नियोजन केले जाणार आहे. जूनच्या अखेरीस अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.