Teacher Eligibility Test Timetable Announced : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकताच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा (टेट) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात येणार असून, या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुमानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी या वर्गांवर शिक्षण सेवक, शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येते. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.

परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर १० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. टीईटी परीक्षेचा पेपर एक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी एक या वेळेत, तर पेपर दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश माहिती प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.