पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. वर्गशिक्षकच अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करत असल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय- ५१ वर्षे) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ११ जुलै ते १९ जुलै २०२५ च्या दरम्यान घडली. बुधवारी उशिरा गुन्हा दाखल झाला. पीडित मुलगी आणि इतर विद्यार्थिनींशी आरोपी शिक्षक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. शिक्षक शाळेत पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडत, पाठीवरून, ड्रेसमध्ये हात घालून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी शिक्षक मुलींच्या वॉशरूममध्ये डोकावून पाहत.
विद्यार्थी लिहीत असताना मुलींच्या गळ्यावरून, पाठीवरून अश्लील हेतूने हात फिरवत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अखेर या घटनेला बुधवारी वाचा फुटली. निगडी पोलीस ठाण्यात संबंधित नराधम शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.