पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण कधी होणार, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी जवळपास ९४ हजार शिक्षकांनी शुल्क भरून नोंदणी केली असून, प्रशिक्षण कधी होणार या बाबत संभ्रम आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जागृती, आधुनिकीकरण-जागतिकीकरणानुसार शिक्षणात करायचे बदल आणि त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम, शिक्षक शिक्षण प्रक्रियेत सुधारणा या संदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एससीईआरटीकडून या प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. एससीईआरटीकडून प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षण ऑनलाइन आणि आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सोय असल्याने स्थळ, वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती मर्यादा असणार नाही. प्रशिक्षणाबाबतची माहिती ई मेल आणि मोबाइल लघुसंदेशाद्वारे कळवण्यात येईल, असे एससीईआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, की शिक्षकांनी नोंदणी करून बराच काळ झाला आहे. प्रशिक्षण ऑनलाइन होणार असले, तरी जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना त्यासाठीच्या तयारीची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या पाहिजेत. जेणेकरून प्रशिक्षणाबाबतचा संभ्रम दूर होईल.

यंदा पहिल्यांदाच सशूल्क..

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यंत हे प्रशिक्षण विनामूल्य घेण्यात येत होते. मात्र यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

शिक्षकांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची प्रणाली तयार असून, एकावेळी मोठय़ा संख्येने शिक्षक लॉगइन झाल्यावर त्याला अडचणी येऊ नये म्हणून चाचण्या सुरू आहेत. प्रशिक्षणाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण १५ जूनपूर्वी पूर्ण केले जाईल.

– विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद