दुखावलेला घोटा आणि गुडघा यांवर ‘स्टेम सेल थेरपी’चा वापर करून दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया पुण्यात प्रथमच करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही सांध्यांच्या दुखावलेल्या आवरणावर (कार्टिलेज) उपचार करण्यासाठी स्टेम सेल थेरपी वापरली जात असे. मात्र आता ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतूनही साध्य झाल्याने त्यात अधिक अचूकता येणार आहे.  
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ऑर्थोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट डॉ. शिरीष पाठक म्हणाले, ‘‘वाहनाला अपघात होऊन किंवा विशेषत: तरुणांमध्ये मैदानी खेळ खेळताना गुडघा, घोटा किंवा खांद्याला दुखापत होण्याची शक्यता असते. सांध्यावरील ‘कार्टिलेज’ला म्हणजे आवरणाला होणारा रक्तपुरवठा तुलनेने कमी असतो. त्यामुळे दुखापतीनंतर सांधे दुखणे, सांध्यात पाणी होणे, सांधे अडकणे, असे त्रास सुरू होतात. तसेच संधीवाताची प्रक्रियाही सुरू होऊ लागते. हे टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या स्टेम सेल थेरपीत रुग्णाच्याच शरीरातील कार्टिलेजचा लहान तुकडा बाहेर काढून प्रयोगशाळेत त्यापासून त्याच प्रकारच्या कार्टिलेज पेशी तयार केल्या जातात. या पेशींमध्ये ‘फायब्रिन’ हा डिंकासारखा घटक मिसळून त्या रुग्णाच्या दुखावलेल्या कार्टिलेजमध्ये सोडल्या जातात. प्रयोगशाळेत तयार केलेल्या कार्टिलेज पेशी सजीव पेशी असल्याने दुखावलेले कार्टिलेज भरून आल्यावर ते चांगल्या प्रतीचे असते. याआधीही कार्टिलेजवरील उपचारांसाठी स्टेम सेल थेरपी वापरली जायची. मात्र त्यात शस्त्रक्रियेदरम्यान सांधा उघडावा लागायचा. आता ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून यशस्वी झाल्याने अधिक अचूकता साधता येते.’’