नवरात्र उत्सवासाठी वर्गणी न दिल्यामुळे टेम्पो मालक आणि चालकास हॉकी स्टीकने जबर मारहाण करून त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचा प्रकार मंगळवार पेठ येथे रविवारी रात्री घडला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खंडणी, मारहाण या कलामांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचे मालक राजू निवृत्ती विधाते (वय ३९, रा. संगमवाडी, खडकी) आणि चालक हरीभाऊ राम मोरे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रफुल्ल देवराम देवकुळे (वय २९), मयूर चंद्रकांत वेळेकर (वय २२), नितीन विठ्ठल ढमढेरे (वय २५) आणि विजय चंद्रकांत खुडे (वय २५, सर्व रा. मंगळवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी वेळेकर व त्याच्या साथीदारांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत एका महिलेचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार मालाचे वजन करण्यासाठी टेम्पो चालक मोरे हे मंगळवार पेठ येथील वजन काटा येथे गेले होते. मोरे यांना अडवून आरोपींनी संगम मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवासाठी पाचशे रुपये वर्गणी मागितली. याबाबत मोरे यांनी टेम्पोचे मालक विधाते यांना कळविले. विधाते हे घटनास्थळी आले. त्यांनी शंभर रुपये वर्गणी देण्याचे मान्य केले. परंतु, आरोपींनी धमकावून पाचशे रुपयांच्या वर्गणीची मागणी केली. विधाते यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यासह मोरे यांना हॉकी स्टीक आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन आरोपींनी त्यांच्या अंगावर लघुशंका केली. याबाबत विधाते यांनी तक्रार दिल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी या चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर वेळेकर व त्याच्या साथीदारांनी श्रीकृष्ण चौकात एका महिलेचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जी. एस. बागवडे अधिक तपास करत आहेत. नागरिकांना धमकावून अशा प्रकारे कोणी वर्गणी मागत असल्यास पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन बर्गे यांनी केले आहे.