धनकवडी गावात यात्रा सुरू असताना गर्दीत अचानक टेम्पो शिरल्याने यात्रेत एकच घबराट उडाली. टेम्पोने दिलेल्या धडकेने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सजावटीसाठी रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकासह टेम्पोन दुचाकींनाही धडक दिली. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

सनी दत्ता ढावरे (वय १६, रा. सहकारनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालक रपेश बळीराम मालुसरे (वय १९, रा. कोंढवा ) याला अटक करण्यात आली आहे. टेम्पोमालक दत्ता घनवट याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विनोद होनराव यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धनकवडीतील ग्रामदैवत जानुबाई मातेच्या यात्रेत परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. रुपेश टेम्पोतून ध्वनीवर्धक तसेच साहित्य घेऊन जात होता. धनकवडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात उतारावर टेम्पो चालक रुपेशचे नियंंत्रण सुटले. टेम्पोने सजावटीसाठी लावलेल्या डिजिटल फलकाला धडक दिली. त्यानंतर टेम्पोने दोन दुचाकींना धडक दिली. त्या वेळी तेथे लावलेल्या दुचाकीवर सनी ढावरे बसला होता. टेम्पोच्या धडकेने सनी गंभीर जखमी झाला. त्यानंतर टेम्पो एका मासे विक्री दुकानाजवळ असलेल्या शेडवर जाऊन आदळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताच्या घटनेमुळे यात्रेत घबराट उडाली. गंभीर जखमी झालेल्या सनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पोचालक रुपेश मालुसरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक यू. एन. लोंढे तपास करत आहेत.