पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षक भरतीसाठी संचमान्यता, तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत, त्याची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर यापूर्वीच्या भरतीमधील नियुक्ती प्रलंबित असलेल्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले. शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनीही सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र संकेतस्थळाद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी? शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या ऑनलाइन कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांना पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याची सुविधा २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये जिल्हा परिषदेकडील उर्वरित १० टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार, तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा विचारात घेऊन जाहिरात देणे गरजेचे आहे. त्यानुसार पदभरतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावलीविषयक माहितीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना बिंदुनामावली प्रमाणित करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बिंदुनामावली न तपासलेल्या संस्थांनी तत्काळ त्याबाबत कार्यवाही करावी. बिंदुनामावली प्रमाणित करण्यासाठी नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खासगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे.