दहावीत मराठी माध्यमाला पसंती   

विद्यार्थ्यांच्या संख्येत ७५ हजारांनी वाढ

संग्रहित छायाचित्र

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा प्रभाव वाढल्याने मराठीची पीछेहाट होत असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर एक आनंददायी बातमी आहे. दहावीची परीक्षा मराठी माध्यमातून देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षांच्या तुलनेत ७५ हजारांनी वाढली आहे.

यंदा मराठी माध्यमातून १२ लाख ६७ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी ११ लाख ९१ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमाला प्राधान्य होते. तर मराठीखालोखाल इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. यंदा ३ लाख २८ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी, तर गेल्या वर्षी २ लाख ८२ हजार ४२ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली होती. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचेही ४६ हजार ७४२ विद्यार्थी वाढल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ५० हजार १२० होती. ती वाढून यंदा ५५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यमातून परीक्षा दिली. गुजराती माध्यमातून २ हजार ९०९, कन्नडमधून २ हजार ८४४, सिंधीमधून ७७, तेलुगुमधून २९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे राज्य मंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

मातृभाषेचे महत्त्व टिकून 

राज्य शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी अरेबिक-देवनागरी, तेलुगु या माध्यमांतून परीक्षा देण्याची मुभा आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मराठी माध्यमाचे महत्त्व दहावीच्या परीक्षेत टिकू न असल्याचे आढळते. मराठी माध्यमाच्या तुलनेत अन्य माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच कमी आहे.

उर्दू तिसऱ्या स्थानी

गेल्या वर्षी उर्दू माध्यमातील ८८ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर यंदा ९६ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी उर्दू माध्यम निवडले. त्यामुळे या माध्यमात ७ हजार ८७० विद्यार्थी वाढले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tenth year prefer marathi medium abn

ताज्या बातम्या