पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी शहरात सुरळीत पार पडली. मात्र, यंदाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाची प्रश्नांची काठिण्य पातळी गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक होती, तसेच रसायनशास्त्रासंबंधित प्रश्नांसाठी केवळ ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा अभ्यास पुरेसा नसल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे नीट परीक्षा देशभरात घेण्यात आली. गेल्या वर्षी या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर, तसेच अनुचित प्रकार होऊ नयेत या दृष्टीने यंदा परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे तपासून, पडताळणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेच्या काठिण्यपातळीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा नीटमधील भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका सर्वांत कठीण होती. अनेक प्रश्न जेईई मुख्य परीक्षेच्या तोडीचे होते. तसेच, रसायनशास्त्रातील प्रश्नांसाठीही उपयोजित कौशल्यांची गरज होती. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा अभ्यास पुरेसा नव्हता.’